
ध्वनी प्रदूषण
आवाजाची तीव्रता डेसिबेल (डीबी) या एककात मोजली जाते. दूरध्वनीचा शोध लावणारे अमेरिकन वैज्ञानिक अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांच्या स्मरणार्थ ध्वनीच्या तीव्रता पातळीच्या एककाला बेल यांचे नाव दिले गेले आहे. डेसिबेल हे घातांकित एकक असून दर १० डीबी आवाजाची तीव्रता दसपटीने वाढते. उदा., २० डीबी आवाज १० डीबीच्या आवाजापेक्षा १० पट असतो तर ३० डीबीचा आवाज १० डीबी आवाजाच्या १०० पट असतो. साधारणत: ८० डीबीपर्यंतचा आवाज मनुष्याला सहन होऊ शकतो. त्यापेक्षा मोठ्या आवाजाचा त्रास होतो. विमाने व रॉकेटे यांचा आवाज १००-१८० डीबीएवढा तीव्र असतो. तसेच बांधकाम, सार्वजनिक कार्यक्रम इत्यादी ठिकाणी आवाजाची पातळी १२० डीबीपेक्षा जास्त असते. गडगडाटी वादळे, जोराचा वारा, भूकंप अशा नैसर्गिक आपत्तींच्या वेळी आवाजाची तीव्रता वाढते. मात्र या घटना क्वचितच घडतात. शहरी भागात अनेक मानवनिर्मित कृतींमुळे ध्वनी प्रदूषण होते. उदा., घरातील दूरदर्शन संच, मिश्रक (मिक्सर), विविध प्रकारचे कारखाने, वाहने, बांधकाम इत्यादी.
ध्वनी प्रदूषणामुळे मनुष्य व प्राणी यांच्या आरोग्यावर आणि वर्तनावर परिणाम होतो. ध्वनीची पातळी वाढली की माणसांमध्ये ताण वाढून हृदयाची धडधड वाढू शकते, रक्तदाब वाढतो आणि हृदयाचे विकार जडू शकतात. तसेच लक्ष विचलित होते, चिडचिड होते, कार्यक्षमता घटते व पचनक्रियेत बदल होतो. सतत होणाऱ्या ध्वनी प्रदूषणामुळे बहिरेपणाही येतो. आपल्याकडील बसचालकांना ते चालवीत असलेल्या आणि अन्य वाहनांमुळे ध्वनी प्रदूषण अनेक वर्षे सहन करावे लागते. त्यामुळे अशा चालकांना बहिरेपणा आल्याची अनेक उदाहरणे आहेत. वाढलेल्या ध्वनीच्या तीव्रतेमुळे अन्न मिळविण्याच्या पद्धतीत बदल झाल्यामुळे काही प्राण्यांचा मृत्यू होऊ शकतो, प्रजननक्षमता व दिशा ओळखण्याच्या क्षमता यांच्यात बदल झाल्यामुळे ते कायमचे बहिरे होतात.
ध्वनीची पातळी वाढत राहिल्यास त्या भागातील प्राणी अधिवासाची जागा बदलतात. असे आढळून आले आहे की, काही पक्षी दिवसाऐवजी रात्री गातात; कारण यावेळी परिसर शांत असतो आणि त्यांचा आवाज जोडीदारापर्यंत पोहोचू शकतो. वाढत्या नागरीकरणामुळे ध्वनी प्रदूषणातदेखील वाढ होत असते. रस्त्यावरील वाहतुकीमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाची पातळी ध्वनी-अडथळे उभारून, वाहनांचा वेग मर्यादित ठेवून, रस्त्यांच्या पृष्ठभागांमध्ये बदल करून, जड वाहनांवर मर्यादा घालून किंवा टायरच्या रचनेत बदल करून कमी करता येते. विमानांमुळे निर्माण होणारा ध्वनी सुधारित एंजिने बदलून तसेच त्यांच्या मार्गात बदल करून कमी करता येतो. तसेच दैनंदिन व्यवहारात शक्यतो हळू आवाजात बोलून, गाणी ऐकताना आजूबाजूच्या व्यक्तींना त्रास होणार नाही याची खबरदारी घेऊन, विविध उपकरणांची व वाहनांची नियमित देखभाल करून, गरज असेल तरच हॉर्नचा वापर करून व फटाक्यांचा वापर टाळून ध्वनी प्रदूषणाची तीव्रता कमी करता येते.
Noise Pollution and Hearing Problem: ध्वनी प्रदूषणामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होत आहे. विशेषत: यामुळे भारतातील तरुणांची श्रवणशक्ती (Hearing Ability) झपाट्याने कमी होत आहे.
सातत्याने वाढणारे ध्वनी प्रदूषण हा संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय बनला आहे. सतत वाढत जाणारी रस्ते वाहतूक, हवाई वाहतूक, रेल्वे, यंत्रसामग्री, उद्योग आणि खूप मोठ्या आवाजात संगीत ऐकणे हे ध्वनी प्रदूषणाचे प्रमुख घटक मानले जातात. आता भारतात ध्वनिप्रदूषणामुळे (Noise Pollution) श्रवणशक्ती कमी होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याचा धक्कादायक खुलासा संयुक्त राष्ट्रांच्या (United Nations) अहवालात करण्यात आला (Noise Pollution and Hearing Problem) आहे.
या अहवालानुसार, भारतातील 63 दशलक्ष लोकांची श्रवणशक्ती कमी होत आहे. इतकेच नाही तर, संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP) द्वारे जारी केलेल्या वार्षिक ‘फ्रंटियर्स रिपोर्ट 2022 (Frontiers 2022: Noise, Blazes and Mismatches)’ मध्ये भारतातील मुरादाबाद शहराला जगातील दुसऱ्या क्रमांकाचे ध्वनी प्रदूषित शहर घोषित केलं आहे.
तरुण वेगाने श्रवणशक्ती गमावत आहेत.
दैनिक हिंदुस्थान वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) म्हटले आहे की, ध्वनी प्रदूषणामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होत आहे. विशेषत: यामुळे भारतातील तरुणांची श्रवणशक्ती (Hearing Ability) झपाट्याने कमी होत आहे. असेच होत राहिल्यास 2030 पर्यंत भारतातील श्रवणदोषांची संख्या दुप्पट म्हणजे 130 दशलक्षांपेक्षा जास्त होईल. या अहवालात असेही सांगण्यात आले आहे की, भारतातील 10 पैकी फक्त दोन लोक या समस्येवर उपचार घेतात आणि श्रवणयंत्र वापरतात.
जगातील 1 अब्ज लोकांची श्रवणशक्ती कमी झाली.
अहवालात असे म्हटले आहे की, मोठ्या आवाजातील संगीत आणि मनोरंजनाच्या इतर साधनांद्वारे दीर्घकाळापर्यंत आवाज कानावर पडल्याने जगभरातील 12 ते 35 वयोगटातील सुमारे एक अब्ज लोकांच्या श्रवणशक्तीला धोका निर्माण होत आहे. जगभरातील सुमारे दीड अब्ज लोक कमी श्रवणशक्तीसह जीवन जगतात. ताज्या अंदाजानुसार, 2030 पर्यंत ही संख्या दोन अब्जांपेक्षा जास्त होऊ शकते.
ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी सोपे उपाय
१. ध्वनी प्रदूषण बंद करा
२. आपल्या टीव्ही , संगीत प्रणाली इ.चा आवाज कमी ठेवा .
३. गरज नसताना गाडीचा होर्न वाजवू नका. .
४. लाउडस्पिकरच्या वापरापासून इतरांना परावृत्त करा..
५. लग्न समारंभामध्ये बँड, फटाक्यांचा वापर टाळा .
६. ध्वनी प्रदूषण संबंधित सर्व कायद्यांची माहिती करून घ्या.
Leave Your Comment